भिनेता सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बिश्नोई गँगचे अनेक लोक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे समोर आले आहेत. पनवेल, रायगडसह अन्य काही भागात वास्तव्यास असलेल्या काही आरोपींना अटक केल्यानंतर झालेल्या तपासात अनेक खुलासे समोर आले आहेत.
हे सर्व आरोपी ठाणे, पनवेल, रायगड, नवी मुंबई आसपासच्या परिसरात वास्तव्यास होते अशी माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी धनंजय उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ न्हवी, वास्पी खान उर्फ वसीम चिकना आणि रिजवान खान उर्फ जावेद खान यांना अटक केली आहे. पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, संपत नेहरा, गोल्डी ब्रार यांच्यासह 17 हून अधिक लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, आरोपी अजय कश्यपने पाकिस्तानातील डोगर नावाच्या व्यक्तीशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला आणि सलमान खानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानातून एके-47 सारखी शस्त्रे मागवण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई आणि संपत नेहरा यांच्या टोळीतील सुमारे 60 ते 70 तरूण मुंबई, रायगड, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि गुजरातमधून आले असून ते सलमान खानवर लक्ष ठेवून आहेत. सलमान खानवर हल्ला करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करण्याची लॉरेन्स गँगची योजना होती. याशिवाय हल्ला केल्यानंतर आरोपींनी कन्याकुमारीहून बोटीने श्रीलंकेला पळून जाण्याची योजना आखली होती. काही लोकांनी सलमान खानच्या घराची रेकी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
बिश्नोई टोळीच्या सोशल मीडिया ग्रुप्सनी सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याची माहिती दिल्याचे उघड झाले आहे. हत्येचा कट रचण्यात 20-25 जणांचा सहभाग होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही अटक केलेल्या लोकांच्या पाकिस्तान कनेक्शनची चौकशी करत आहोत आणि आणखी काही लोकांचा शोध सुरू आहे. ऑक्टोबर 2023 पासून 16 सदस्यीय पोलिस पथक या प्रकरणात काम करत आहे.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांचा आणि अटक झालेल्या आरोपींचा काहीही संबध नाही. अटक करण्यात आलेले चौघे पनवेलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. त्यांच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार होण्यापूर्वीही ते दोघे वेगळे राहत होते.