प्रत्येक मोबाइलधारकांना मिळणार ही सुविधा… 

 सायबर क्राइमच्या घटना दिवसंदिवस वाढत आहेत. यामुळे मोबाइल यूजर्ससाठी नवनवीन रणनीती सरकारकडून आणली जात आहे. तसेच वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. आता सरकारने फेक स्पॅम कॉल ओळखण्यासाठी नवीन सर्व्हीस सुरु केली आहे. त्याची चाचणी देशातील दोन शहरांमध्ये सुरु झाली आहे. मुंबईत अन् हरियाणामधील चंदीगडमध्ये ही सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे या शहरांमध्ये कॉल करणाऱ्याचा नंबरसोबत त्याचे नाव मोबाईलवर सेव्ह नसताना दिसू लागले आहे. येत्या 15 जुलैपर्यंत ही सेवा देशभरात सुरु करण्याचे आदेश टेलिकॉम कंपन्यांना सरकारने दिले आहे. यामुळे कोणता कॉल घ्यावा अन् कोणता घेऊ नये, याचा निर्णय मोबाईलधारकाला घेता येणार आहे. तसेच ट्र कॉलरसारखे अ‍ॅपची गरज पडणार नाही. मोदी 3.0 सरकारच्या 100 दिवसांचा अजेंडामधील हा विषय आहे.

सेंट्रल गर्व्हनमेंट आणि टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) म्हणजेच ट्रायने कॉलसोबत नाव दिसेल अशी सेवा सुरु करण्याचे आदेश दिले होते. कॉलर नेम प्रेजेंटेशन (CNAP) अशी ही सेवा आहे. चाचणीतून या सेवेचा निकाल कसा असणार? याचा अहवाल दूरसंचार विभागाला देण्यात येणार आहे. त्यानंतर ही सेवा सर्वांना देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

कॉल करताना जे नाव हे येईल, ते सिमकार्ड घेताना भरलेल्या अर्जावरील नावानुसार असणार आहे. ट्रूकॉलर सारखे अ‍ॅप आयडी क्रिएट करताना दिलेल्या नावानुसार ही सेवा देते. सरकारने ट्रूकॉलर सारखी सेवा सुरू देण्याची योजना आखली होती. रेग्युलेटरने रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल सारख्या कंपन्यांना वर्षभरापूर्वी ही सेवा देण्याची म्हटले होते. आता त्याला अंतिम स्वरुप मिळाले आहे.