मंगळवेढ्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण….

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईमुळे अभिजीत पाटील यांना शरद पवार यांना सोडून भाजपच्या गोटात जावे लागले. मात्र, अभिजीत पाटील यांचे पवारांवरील प्रेम अजूनही कायम असल्याचे दिसून येते.कारण, मंगळवेढ्यातील त्यांच्या कार्यालयात शरद पवार यांच्या छायाचित्रासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लोगो अजूनही कायम आहे. सध्याचे राजकीय वातावरण पाहता अभिजीत पाटील यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घरवापसी होणार का? याची चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. त्या प्रवेशाच्या कार्यक्रमात पाटील यांच्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा उमेदवारीचे सूतोवाच केले होते, तर पुढे त्यावर शिक्कामोर्तब करून पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती.

लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आदी मातब्बरांची फौज होती. महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी काम केले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात प्रकट झालेला रोष विधानसभा निवडणुकीत कॅश करण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे.

विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, प्रशांत परिचारक यांची नावे चर्चेत आहेत, त्यामुळे महायुती आणि महाआघाडीकडून कोणाला संधी मिळते, याची प्रचंड उत्सुकता पंढरपूर-मंगळवेढ्यात आहे.

अभिजीत पाटील यांच्या मंगळवेढ्यातील जनसंपर्क कार्यालयावरील फलक लोकसभा निवडणुकीनंतर काढण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी तो फलक पुन्हा लावण्यात आला आहे. त्या फलकाबरोबर शरद पवार यांच्या छायाचित्रासह राष्ट्रवादी काँग्रेसचा लोगो असलेला फलकही कायम आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.