उजनी धरण क्षेत्रातील पाऊस ओसरला आहे. धरणाचीपाणीपातळी अजूनही वजा ४८ टक्के आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. शहरात पाच दिवसांआडच पाणीपुरवठा होणार आहे, असे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले.उजनी धरणाची पाणीपातळी इतिहासात प्रथमच वजा ५० टक्क्यांच्या खाली गेली. धरणातून तिबार पंपिंग करावे लागले. दहा दिवसांपूर्वी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला. १७ जूनपासून पालिकेने तिबार पंपिंग बंद केले. धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता; परंतु धरणात केवळ पाच ते सहा टक्के पाणी आले.
आषाढी एकादशीचा सोहळा जवळ आला आहे. पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भीमा नदीत पाणी सोडावे लागेल. पाऊस न झाल्यास धरणाची पाणीपातळी आणखी कमी होईल. त्यामुळे पालिकेने धरणातील तिबार पंपिंगचे पंप कायम ठेवले आहेत.
पाणीपातळी आणखी कमी झाली की तिबार पंपिंगद्वारे पाणी उपसा सुरू राहील. दौंड येथून गुरुवारी धरणात दोन ३५७ क्युसेकचा विसर्ग सुरू होता.शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्त्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा, चिंचपूर बंधारा सध्या ओसंडून वाहत आहे. दोन्ही बंधाऱ्यांची पाणीपातळी ४.७० मीटर आहे. हे पाणी पुढील दोन महिने पुरणार आहे.