डब्ल्यूसीएल 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंडियाने ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी विजय मिळवला आहे. इंडियाने या विजयासह फायनलमध्ये धडक मारली आहे. इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 255 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. या विजयी धावांचा पाठलाग करताना कांगारुंना 7 विकेट्स गमावून 168 धावाच करता आल्या. इंडियाने अशाप्रकारे हा सामना जिंकला. आता शनिवारी 13 जुलै रोजी इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला होणार आहे.
या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.टीम पेन याचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या एकालाही टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर फार वेळ तग धरता आला नाही. टीम पेनने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. नॅथन कुल्टर नाईल 30 धावा करुन माघारी परतला. कॅलम फर्ग्युसन याने 23 धावांचं योगदान दिलं. डॅनियल ख्रिश्चनने 18, एरॉन फिंच 16, बेन कटिंगने 11 आणि बेन डंकने 10 धावा केल्या. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. इंडियाकडून धवल कुलकर्णी आणि पवन नेगी या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हरभजन सिंह, इरफान पठाण आणि राहुल शुक्ला या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंडियाने चौघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 254 धावा ठोकल्या. इंडियाकडून ओपनर रॉबिन उथप्पा याने सर्वाधिक 65 रन्स केल्या. त्यानंतर कॅप्टनने मिडल ऑर्डरमध्ये विस्फोटक बॅटिंग केली. युवराजने 28 चेंडूत 59 रन्स केल्या. तर अखेरीस युसूफ आणि इरफान या पठाण बंधूंनी तोडफोड खेळी केली. इरफानने 50 आणि युसूफने नाबाद 59 धावांची खेळी करत इंडियाला 250 पार पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियासाठी पीटर सीडलने 4 विकेट्स घेतल्या. तर झेव्हियर्स डॉहर्टी आणि कुल्टर नाईल या दोघांना 1-1 विकेट मिळाली.