आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवण्यावर ठाम आहेत. महायुतीकडून सध्या पक्षांचे मेळावे घेतले जात आहे, पण या मेळाव्यातूनही ते महायुतीचंच सरकार येणार, महायुतीच जिंकणार असल्याचा दावा करत आहेत. पुण्यात आज भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडत असून पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली.
यावेळी, लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत, अशी घोषणाच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यामुळे, महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचं स्पष्ट झालं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याचं दिसून येतं.