मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक भूमिका घेतलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे मी उपोषण स्थगित करत आहे. पण येत्या 13 ऑगस्टपर्यंत मी सरकारला वेळ देतो, तोपर्यंत त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. “मला रात्री हात पाय धरुन सलाईन लावण्यात आले. माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे असे म्हणणे होते की, आम्हाला तुम्ही आणि आरक्षण दोन्हीही पाहिजे. पण मला जर असंच सलाईन लावत असतील, तर दुपारी उपोषण स्थगित करु. कारण सलाईन लावल्याने उपोषणाला आता अर्थ नाही. त्यामुळे गावातील ज्या महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला, त्यांच्या हस्ते उपोषण सोडणार” अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.
“येत्या 13 ऑगस्टपर्यंत मी सरकारला पुन्हा वेळ देतो. 13 ऑगस्टपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्या. सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे, ती ओढण्यासाठी आता मला तयारी करायची आहे. त्यामुळे मी सलाईन लावून उपोषण करणार नाही. सलाईन न लावता उपोषण करू दिले तरच उपोषण सुरू ठेवणार”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
“मी काही झुकत नाही. मी जेलमध्ये जायला तयार आहे. मला आता जेलमध्ये टाका. मी उद्या जेलमध्ये जायला तयार आहे. मला आता टाकून फडणवीस यांना निवडणूक काढायची आहे. पण मी आत गेलो तरी भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे. मराठ्यांनी भाजपसोबत राहू नका. मी मेलो तरी, माझ्या आत्म्याला शांती तेव्हाच जे हे सर्व पडतील. वेळ पडली तर आम्ही ओबीसीच्या नेत्यांना निवडून आणू”, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
उपोषण संपल्यानंतर पुन्हा राज्य दौरा सुरु करणार आहे. ही घरी बसायची वेळ नाही. येत्या 7 ऑगस्टपासून 13 ऑगस्टपर्यंत पुन्हा राज्यात दौरा करणार असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
दरम्यान मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण करत होते. पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत खालवली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी हे आमरण उपोषण करत होते.