सांगलीच्या चांदोली धरणाचा परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाचा परिसर बुधवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्याने हादरल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे 4 वाजून 47 मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. शिराळा तालुक्यातील  वारणावती परिसरात सुमारे आठ किलोमीटर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. 

विशेष म्हणजे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच भूकंप झाला. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच भूकंपाचे हादरे जाणवले. त्यादृष्टीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, हा भूकंप सौम्य असल्यामुळे चांदोली धरणास कोणताही धोका नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. गेल्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. हे धरण 82 टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मात्र, त्याचवेळी भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत भूकंप

काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, जालना अशा एकूण चार जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी होती. विदर्भातील वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. तर जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही भाग भूकंपाच्या धक्क्याने हादरला होता. याशिवाय,  परभणी शहरासह सेलू, गंगाखेड आदी भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

भूकंप आणि पावसाचे नाते काय?

काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात भूकंपाचे धक्के बसले होते तेव्हा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक निरीक्षण नोंदवले होते. मराठवाड्यातील भूकंपाचे धक्के हे भविष्यातील चांगल्या पावसाचे चिन्ह असू शकते,  असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. “परभणीतील गुगळी धामणगाव येथे सकाळी 7.14 वाजता सगळ्यांना भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यात आहे. भूकंप हा चांगल्या पावसाचे लक्षण आहे. जेव्हा-जेव्हा भूकंपाचे धक्के बसतात, तेव्हा-तेव्हा खूप पाऊस पडतो लातूर जिल्ह्यातील किल्लारीला जेव्हा भूकंप झाला होता, त्या वर्षी खूप पाऊस झाला होता. तशीच परिस्थिती यावेळी होणार आहे,” असे पंजाबराव डख यांनी सांगितले होते.