आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यातून रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची (MNS) रणनीती, उमेदवारांची निवड कशी होईल, याबाबत भाष्य केले. निवडणुकांपूर्वी इतर पक्ष सर्वेक्षणं करतात. पण मी आपल्याच पक्षातील चार ते पाच लोकांची टीम तयार करुन प्रत्येक जिल्ह्यात पाठवली होती. याची मनसेच्या अनेक तालुकाध्यक्षांना कल्पनाही नव्हती. मनसेच्या या विविध पथकांनी संबंधित जिल्ह्यांमध्ये सर्व्हेदेखील पूर्ण केला आहे. त्याचा अहवालही माझ्याकडे आला आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिली जाईल. तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा अशा मनोवृत्तीच्या कोणत्याही व्यक्तीला तिकीट दिले जाणार नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत मला काहीही करुन मनसेचे आमदार सत्तेत बसवायचे आहेत. यावर अनेकजण हसतील, त्यांना हसू दे. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. आम्ही सगळेजण त्या तयारीला लागलो आहोत. मी तयार केलेल्या टीम्स पुन्हा आता प्रत्येक जिल्ह्यात पुन्हा येतील. ते तुमच्याकडील माहिती जाणून घेतील. त्यांना मतदारसंघातली मूळ परिस्थिती समजावून सांगा. काय गोष्टी होऊ शकतात, याचा विचार करा. मी पाठवलेल्या मनसेच्या पथकांना योग्य माहिती द्या. त्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील का, असा कोणताही विचार मनात आणू नका. जवळपास 225 ते 250 जागा आपण लढवणार आहोत, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.