वाकुर्डे बुद्रुकचे पाणी कार्वे तलावामध्ये दाखल….

कार्वे (ता. वाळवा) येथील तलावामध्ये जलसंधारण विभागाने वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनद्वारे करमजाई तलावातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सोडले आहे. त्यामुळे बंदिस्त पाइपलाइनद्वारे येणारे पाणी व दमदार पावसामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.कार्वे येथील तलाव मातीचा बंधारा पद्धतीचा असून तालुक्यातील सर्वात मोठा तलाव आहे.

या तलावातील पाण्यामुळे गावातील बहुतांस जमीन ओलिताखाली आली आहे. मागील वर्षी पावसाळ्यात करमजाई तलावातून वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी काही दिवस सोडण्यात आले. मात्र अपुऱ्या पावसामुळे तेही बंद करण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षी तलाव निम्माच भरला होता. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी करमाई तलाव भरल्यानंतर तेथील अतिरिक्त पाणी वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या बंदिस्त पाइपलाइने सायपन पद्धतीने कार्वे येथील तलावात सोडले आहे.

गेले चार दिवस पाइपलाइनद्वारे येणारे पाणी व परिसरात पडणारा दमदार पाऊस यामुळे येथील तलाव्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तलावाची पाणी साठवण क्षमता व येथे पडणारा कमी पाऊस यामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरत नव्हता. मात्र वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाणीद्वारे हा तलाव पूर्ण भरण्याची शक्यता असून त्यामुळे येथील शेतीला फायदा होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून नागरिकांची मागणी होती. ती पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे नागरिक समाधानी आहेत.