मुलांना टिफीनमध्ये काय नवीन द्यावे हा प्रश्न सगळ्याच महिलांना पडतो. यामुळे बऱ्याचेवळा कधी वेळ नाही म्हणून तर कधी थोडा चेंज म्हणून आपण मुलांना टिफीनमध्ये बाजारात मिळणारे पॅकबंद पदार्थ देतो. पण हे पॅकबंद पदार्थ फक्त जिभेची चव वाढवणारे असतात. हे पदार्थ ताजे राहावेत म्हणून त्यात विविध प्रकारचे प्रिझर्वेटीव्हज् वापरण्यात येतात. हे प्रिझर्वेटीव्हज् मुलांच्या नाजूक शरीरासाठी हानिकारक असतात. त्याऐवजी मुलांना घऱात शिजवलेले ताजे अन्न, सिझनल खाद्य टिफीनमध्ये द्यावेत. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यादिवसात होणाऱ्या आजरांपासून मुलांचे संरक्षण होते.
फळ
मुलांच्या टिफिनमध्ये हंगामी फळे ठेवावीत. कारण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळे हा सर्वोत्तम पर्याय आहे. घरी मुलं फळे खाण्यास कंटाळा करतात. पण शाळेत शिक्षकांच्या धाकाने सगळा टिफिन संपवतात. सिझनल फळांमध्ये त्या त्या ऋतुमानात पचणारे आणि आवश्यक असणारे औषधीगुण असतात. यामुळे मुलांना टिफीनमध्ये फळ द्यावीत.
अंडी
जर तुम्ही मांसाहारी असाल तर मुलांना अंड्याच्या वेगवेगळ्या रेसिपी करून टिफीनमध्ये द्याव्यात. अंडी हा मुलांच्या पोषणातील मुख्य आहार आहे. अंड्यातील विविध पौष्टीक घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे मुलांना आठवड्यातून किमान दोन किंवा तीन वेळा मुलांना टिफीनमध्ये अंडी देऊ शकता. एग रोल, एग भुर्जी अशा कोणत्याही प्रकारे मुलांच्या आहारात अंड्यांचा समावेश करू शकता.
भाज्या
जर मुलं भाजी खात नसतील तर तुम्ही त्यांना काही वेगळ्या पद्धतीने भाज्या खायला घाला. त्यासाठी पराठे किंवा रोलच्या रूपात तुम्ही हंगामी भाज्या सहजपणे मुलांना टिफीनमध्ये देऊ शकता.