गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू हे सरकारवर नाराज दिसत आहेत. मध्यंतरी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांचे मन वळवण्यात सरकारला फारसे यश आल्याचे दिसून आले नाही. त्यातच त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला पेव फुटले आहे. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी जनआक्रोश मोर्चातून सरकारवर प्रहार केला. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगाच्या मुद्यावरुन बच्चू कडू राजकीय भाकर फिरवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू हे महायुतीसोबत की महाविकास आघाडीसोबत असतील, यावर त्यांनी भाष्य केले आहे.
दबावाला न जुमानता बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भरपावसात शुक्रवारी भव्य मोर्चा काढला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवासह शेतकरी, शेतमजूरांनी हजेरी लावली. मागण्या मान्य करण्यासाठी 1 सप्टेंबरपर्यंत सरकारला आता नवीन डेडलाईन दिल्याची माहिती त्यांनी दिली. मी नाराज नाही, शेतकरी नाराज आहे. त्यासाठी मी लढतोय. काल सरकारकडून मला फोन आला होता माझी चर्चा झाली. मी महायुतीवर दबाव टाकत नाही, रवी राणाला माझे कार्यकर्ते उत्तर देणार, मी नाही असे त्यांनी सांगितले.
आज सकाळीच बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी अगोदरच पवारांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगाच्या समस्या हे राजकीय मुद्दे झाले पाहिजे, ते निवडणुकीचे मुद्दे झाले पाहिजे, हे मुद्दे आपल्याला चव्हाट्यावर आणायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी याच मुद्यांवर पवार यांच्याशी संवाद साधल्याची माहिती दिली.
महायुतीत रहायचं कि नाही यावर निर्णय घेणार आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिल्यास त्यावर विचार करणार. 1 तारखेला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असे शरद पवार यांच्या भेटीपूर्वी बच्चू कडू यांनी म्हटले होते. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.त्यांना महाविकास आघाडीसोबत जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भविष्यात काही पण होऊ शकते, असे मोठे संकेत त्यांनी दिले.