लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्या, गुरुवारपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारल्याने आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून ते सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून राज्यात पेटलेल्या वातावरणाची झळ अधिवेशनाला बसण्याची चिन्हे आहेत.घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील निष्पाप नागरिकांचे मृत्यू, पुण्यातील पोर्श कार प्रकरण आणि अंमली पदार्थांचे साठे सापडल्याने कायदा सुव्यवस्थेवरून विरोधकांना रान उठविण्याची संधी मिळणार आहे.
शिवाय शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आणि पाऊस लांबल्याने राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती यामुळे सत्ताधारी पक्षासाठी हे शेवटचे पावसाळी अधिवेशन जड जाण्याची चिन्हे आहेत.राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांची धग या अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारला बसण्याची शक्यता आहे. मराठा विरुद्ध ओबीसी या वादाने राज्यातील राजकीय वातावरण पेटले आहे. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीत मतभेद आहेत.
अंमली पदार्थांचा साठा सापडणे, पुण्यातील अंमली पदार्थ सेवनाचे व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल होणे, पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणात दोघांचा झालेला मृत्यू, घाटकोपरमध्ये महाकाय फलक कोसळून झालेले मृत्यू, पावसात खंड पडल्याने राज्याच्या विविध भागांत निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यस्थेची स्थिती आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधी पक्षाने आखली आहे.
अशातच महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गळचेपी होत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप झाल्याने सरकारमधील बेबनाव समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला महायुती म्हणून सामोरे जाण्याचे आव्हान सत्ताधारी पक्षसमोर आहे.
महागाई, दुष्काळावरून सरकारला घेरण्याची चिन्हे
कायदा-सुव्यवस्था, निष्पापांचे मृत्यूंवरूनही रान उठणार
‘मराठा विरुद्ध ओबीसी’ वादाचेही पडसाद
