सांगोल्यातील माडग्याळ मेंढ्यांच्या बाजारात लाखोंची उलाढाल…..

सांगोला येथील धनगर समाज बांधवांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी सणाचे औचित्य साधून सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माडग्याळ मेंढ्यांचा बाजार भरवला होता. या बाजारासाठी सोलापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक राज्यातून राज्यातील अनेक भागातून धनगर समाज बांधव गुलाल व भंडाऱ्याची उधळण करीत माडग्याळ मेंढ्या, बकरी खरेदी विक्रीसाठी सांगोल्यात घेऊन आलेले होते.

सांगोला येथे सणाचे औचित्य साधून भरवलेल्या माडग्याळ जातीच्या मेंढ्यांच्या बाजारात आटपाडी येथील सोमनाथ जाधव यांचा कर्नाटक महाराष्ट्राचा चॅम्पियन माडग्याळ मेंढा आकर्षण ठरला बाजारात लाखांपासून ते चोचदार मानदेशी माडग्याळ मेंढ्याला 25 लाखापर्यंत बोली आल्याने बाजारात सर्वत्र माडग्याळ मेंढ्यांचा बोलबाला दिसून आला.

दिवसभर सुमारे 1000 माडग्याळ मेंढ्यांच्या खरेदी विक्रीतून सुमारे दीड कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगोला येथील हौशी मेंढपाळ बाबू मेटकरी यांनी सांगितले. माडग्याळ मेंढ्या बकरी बाजाराचे यंदाचे चौथे वर्ष होते. सांगोला येथील धनगर समाज बांधवांकडून दोन वर्षांपूर्वी माडग्याळ मेंढ्याच्या बाजाराचा शुभारंभ केला होता.

पहिल्याच बाजारात मेंढ्यांची खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याने मेंढपाळ बांधवांचा उत्साह आणखीनच वाढला आहे. दरम्यान सांगोल्यातील खिलार जनावरांचा बाजार जसा पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्धीस उतरला आहे तशाच प्रकारे माडग्याळ मेंढ्यांच्या बाजारामुळे कर्नाटक व महाराष्ट्रातील हौशी माडग्याळ मेंढपाळाच्या प्रसिद्धीस उतरलेला आहे.