अलीकडच्या काळात चोरींच्या प्रकारात खूपच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अशीच सांगोला तालुक्यात एक चोरी उघडकीस आलेली आहे. सांगोला तालुक्यामधील कडलास गावातील गणेशवाडी येथे राहत असलेल्या सोपान गायकवाड यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी जिन्याच्या बाजूस असलेल्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील पावणेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे साडेपाच तोळ्यांचे दागिने लंपास केले.
ही घटना काल म्हणजेच शनिवारी 10 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली आहे. सोपान गायकवाड व त्यांची पत्नी जनाबाई हे दोघेच घरात राहतात त्यांची दोन्ही मुले नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे राहतात. शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी रात्री जेवण करून साडेअकरा वाजता गायकवाड पती-पत्नी झोपले व त्यानंतर.जनाबाई सकाळी उठून झाडलोड करत असताना अंगणात गेटचे कुलूप तोडून बाजूला पडलेले दिसले.
त्यानंतर जनाबाई यांनी पती सोपान यांना घडलेली घटना सांगितली त्यानंतर जिन्याच्या बाजूला असलेल्या खोलीत आत गेले असता आतून लावलेली कडी उचकटलेली दिसली. तसेच लोखंडी कपाट उघडून पाहिले असता त्यातील दागिने दिसून आले नाहीत. त्यामध्ये तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण त्याची किंमत दीड लाख रुपये व अडीच तोळ्याचे लक्ष्मी हार त्याची किंमत एक लाख 25 हजार असे दोन लाख 75 हजार रुपयाची चोरी ही अज्ञात चोरट्यांनी केलेली आहे.
याची फिर्याद जनाबाई सोपान गायकवाड यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.