‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन नव्या ढंगात आणि नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिझनने अल्पावधीतच रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचा मंच अभिनेता रितेश देशमुखने दणाणून सोडला आहे. नव्या सिझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, कल्ला या सर्वच गोष्टी सिझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरत आहेत. ग्रँड प्रीमियरपासून सुरू झालेली ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे.
तरुणाई, महिलावर्ग ते आबाल वृद्ध अशा सर्वांनाच ‘बिग बॉस मराठी’ने वेड लावलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ची आणि रितेशच्या कमाल होस्टिंगची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत.‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय रिॲलिटी शोच्या शनिवारच्या भाऊच्या धक्क्याला 3.7 रेटिंग मिळालं आहे. रविवारच्या अक्षय कुमार स्पेशल भाऊच्या धक्क्याला 4.0 रेटिंग मिळालं आहे. एकंदरीतच ‘भाऊच्या धक्क्याला’ 3.9 एव्हरेज रेटिंग मिळालं आहे. ‘बिग बॉस मराठी’ने संपूर्ण आठवडा गाजवला आहे. खरंतर ‘बिग बॉस मराठी’ने स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. इतर मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांना मागे टाकत ‘बिग बॉस मराठी’ने इतिहास रचला आहे.
जुलै महिन्यात ‘बिग बॉस मराठी’चं बिगुल वाजलं आणि नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात झाली. महाराष्ट्रातील घराघरांत रात्री नऊच्या ठोक्याला ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन पाहिला जातोय. कॉलेजच्या कट्ट्यापासून ते कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’बद्दल चर्चा होताना दिसून येत आहे.‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. गेल्या चार आठवड्यात सदस्यांना ‘बिग बॉस मराठी’चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे.
आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत आहेत. त्यामुळे या नव्या सिझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चार सिझन्सचं सूत्रसंचालन निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी केलं होतं. यंदाच्या सिझनसाठी पहिल्यांदाच रितेशची निवड झाली आहे. रितेशला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकेल का, असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला जात होता. मात्र टीआरपीच्या या रेकॉर्डने त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.