‘केवळ मोदींच्या हस्ते शिवरायांचा पुतळा उभारायचा होता; जयंत पाटलांचा हल्लाबोल

केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळा उभारायचा हेच सरकारचे ध्येय होते. हे इव्हेंट सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमीशन घेणं आणि कंत्राट वाटणे एवढंच काम सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं. मात्र हा पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 

जयंत पाटील म्हणाले की, ही घटना अत्यंत गंभीर आहे. महाराजांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही. केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळा उभारायचा हेच त्यांचे ध्येय होते. हे इव्हेंट सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमीशन घेणं आणि कंत्राट वाटणे एवढंच काम सुरू आहे. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत ही हेच झाले आहे. महाराजांचे नाव वापरायचे, पण काळजी घ्यायची नाही, असे त्यांनी म्हटले आहे.