छत्रपती संभाजीराजेंच्या ‘स्वराज्य’चा पहिला उमेदवार ठरला!

माजी राज्यसभा खासदार व स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मार्चेबांधणी सुरू झाली आहे. दहीहंडीचा मुहूर्त साधत छत्रपती संभाजीराजेंनी आपला पहिला उमेदवार नवी मुंबईतून जाहीर केला आहे.स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठा युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुश (बाबा) कदम यांना संघटनेकडून पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. अंकुश (बाबा) कदम युवा फाउंडेशनच्या वतीने घणसोली येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संभाजीराजे यांनी उपस्थित राहून गोविंदा पथकांचा सन्मान केला. मराठी कलाकारांबरोबरच मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी या दहीहंडी उत्सवाला होती.


शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीवर काम करून स्वराज्य निर्माण करणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी या वेळी स्पष्ट केले. तसेच दहीहंडीचा मुहूर्त साधत छत्रपती संभाजीराजेंनी आपला पहिला उमेदवार नवी मुंबईतून जाहीर केली. स्वराज्यच्या माध्यमातून परिवर्तनासाठी हंडी फोडली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्यासाठी स्वराज्यने पाऊल टाकले आहे. जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विधानसभेत राज्यातील किती जागा लढवायच्या या विषयावर चाचणी, चर्चा सुरू आहे, असे या वेळी सांगण्यात आले.नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील माजी मंत्री आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय नाहटा व जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यात चुरस सुरू आहे, तर महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू आहेत. त्यातच युवा वर्गान स्वराज्य संघटनेला साथ दिली आहे. त्यामुळे मातब्बरांना स्वराज्यच्या प्रवेशामुळे मतविभाजनाचा फटका बसणार आहे.