शरद पवार पंढरपुरात कोणाच्या हाती देणार तुतारी? भाजप नेत्याचीही चर्चा!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून तुतारीच्या उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. अगदी विरोधी पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून निवडणूक लढविण्याचीही अनेकांची तयारी दिसत आहे.यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील यांचीही भर पडली आहे.

त्यांनीही नुकतीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट उमेदवारीची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून तुतारीची उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.

तसेच, भगीरथ भालके हेही पंढरपूर मतदारसंघातून इच्छूक आहेत. त्यांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही विधानसभेसाठी तुतारी हाती घ्यावी, असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह आहे. मात्र, परिचारकांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.