दिपकआबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बामणी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना बामणी ता. सांगोला गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील तसेच ज्येष्ठ नेते सदाशिव तात्या साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षाला कायमचा रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे बामणी गावात शेतकरी कामगार पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. हा पक्ष प्रवेश दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत बामणी ता. सांगोला येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते सदाशिव तात्या साळुंखे यांच्यासह उपसरपंच अर्जुन साळुंखे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

सत्ता किंवा पद असो अथवा नसो राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे नेहमीच तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतात. शासन तसेच प्रशासनाकडे रखडलेली कामे मार्गी लावण्यात दिपकआबांचा हातखंडा आहे. सामान्य माणसासाठी सदैव झटणाऱ्या दिपकआबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला असे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांनी सांगितले.