2020 पासून एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ नाहीच…

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या असं म्हणत गुलाल उधळण्यात आला. तर माध्यमांसमोर काही नेत्यांनी त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पण आता पण प्रत्यक्षात ही एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस संघटनेकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत एसटी कर्मचारी संघटनांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली होती. त्यात कर्मचाऱ्यांना पगारवाढ 2020 पासून लागू करण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता सरकारने आपला शब्द फिरवल्याचे बोलले जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ दिल्याचा महायुती सरकारचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरसकट सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6500 रुपयांची पगारवाढ एप्रिल 2020 पासून देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या बैठकीत स्पष्ट सांगितले होते. पण ही पगारवाढ एप्रिल 2020 पासून नाही तर सप्टेंबर 2024 पासून लागू होणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले आहे.