एकीकडे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सध्या ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत आहे. मात्र दुसरीकडे परतीच्या पावसानं चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आज देखील हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.पुढील तीन चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे, या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आज मुंबईत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे, पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.विदर्भात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.मराठवाड्यात देखील आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.कोकणातही आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, कोकणातील रत्नागिरी, पालघर,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान दुसरीकडे चक्रीवादळ दाना हे तीव्र वेगानं ओडिशाच्या किनारपट्टीनंकडे सरकत असून, ते ताशी 120 किमी वेगानं धडकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.