करोडो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक उत्सुक असतात. मात्र लांबच लांब रांगा आणि गर्दी यामुळे अनेकांना पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनापासून वंचित राहावे लागते. मात्र आता पंढरपुरातील लांबच लांब दर्शन रांग इतिहासजमा होणार असून भाविकांना केवळ 2 तासात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच तिरुपतीच्या धर्तीवर विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात टोकं दर्शनाची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी लागणारा दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी राज्य सरकारच्या उच्यधिकार समितीने मान्यता दिली आहे.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केवळ 2 तासात दर्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे आषाढी एकादशीलाही ही सुविधा सुरु असणार आहे. यासाठी 110 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
येत्या महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी लागणारा दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी राज्य सरकारच्या उच्यधिकार समितीने शनिवारी मान्यता दिली आहे. पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी गोपाळपूर पत्राशेड येथे चार मजली अद्ययावत दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. त्यासोबत या ठिकाणाहून थेट मंदिरापर्यंत 1050 मीटर लांबीचा स्काय वॉक उभारला जाईल.
पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपले टोकन घ्यावे लागणार आहे. टोकनवर दिलेल्या वेळेपूर्वी अर्धा तास भाविकांना या प्रतीक्षा कक्षात पोचावे लागेल. यानंतर मोजून दीड ते दोन तासात हा भाविक थेट विठ्ठल -रुक्मिणीच्या मंदिरात या स्कायवॉक मधून चालत पोहचू शकणार आहे.