टीम इंडिया नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी टीम इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात अनऑफीशियल टेस्ट मॅचेस खेळवण्यात येत आहेत. टीम इंडिया ए चं युवा ऋतुराज गायकवाड याच्याकडे नेतृत्व आहे. हा पहिला सामना ग्रेट बॅरियर रीफ अरेना, मॅके येथे खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 200 धावांच्या आत गुंडाळून मोठी आघाडी घेण्यापासून यशस्वीरित्या रोखलं आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव हा 195 धावांवर आटोपला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 88 धावांची आघाडी मिळाली आहे. टीम इंडियाकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक 6 झटके देत ऑस्ट्रेलियाला सुरुंग लावला.
टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर कांगारुंच्या एकाही फलंदाजाला 40 पार पोहचता आलं नाही. टॉप ऑर्डरमधील दोघांना तर भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियासाठी चौघांनी 30+ धावा केल्या. कॅप्टन नॅथन मॅकस्विनी याने सर्वाधिक 39 धावांचं योगदान दिलं. कूपर कोनोली याने 37 धावांची खेळी केली. टॉड मर्फी आणि ब्यू वेबस्टर या दोघांनी प्रत्येकी 33 धावा जोडल्या. मार्कस हॅरिस याने 17 तर फर्गस ओ नील याने 13 धावांची भर घातली. सॅम कोन्स्टास आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट या दोघांना खातंही उघडता आलं नाही. तर इतर तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.मुकेश कुमार याने 18.4 ओव्हरमध्ये 46 रन्सच्या मोबदल्यात या 6 विकेट्स घेतल्या.
तर प्रसिध कृष्णा याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर नितीश कुमार रेड्डी याने 1 विकेट घेत मुकेश आणि प्रसिधला चांगली साथ दिली. त्याआधी टीम इंडियाच्या फलंदाजांनी पहिल्या डावात घोर निराशा केली. टीम इंडियाने पहिल्या डावात 47.4 षटकांमध्ये सर्वबाद 107 धावा केल्या. त्यानतंर कांगारुंना 195वर रोखल्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज दुसऱ्या डावात किती धावांचं आव्हान ठेवतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.