Ind Vs Pak : भारताचा पाकिस्तानवर विजय!

कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताने शानदार खेळ करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 6 धावांनी नमवले. यासह टी-20 विश्वचषकात भारताने सातव्यांदा पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला.प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताचा डाव 19 षटकांत 119 धावांत संपुष्टात आला. यानंतर भारतीयांनी पाकला 20 षटकांत 7 बाद 113 धावांवर रोखले.पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारत अवघ्या 119 धावांवर ऑलआऊट झाला. भारतीय संघाकडून ऋषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या.

पंतने 31 चेंडूत 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. अक्षर पटेलने 20 धावा केल्या, पण अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही.पाकिस्तान जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करायला उतरला तेव्हा बाबर आझम फक्त 13 धावा करून लवकर बाद झाला. दुसरीकडे, मोहम्मद रिझवानने 44 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित दिसत होता.

बाबर आझमच्या संघाला 48 चेंडूत 48 धावा करायच्या होत्या, 8 फलंदाज उरले होते, पण यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले.टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. त्यामुळे पाकिस्तानी संघ हा सामना 6 धावांनी हरला. हार्दिक पांड्या भारताकडून 13 वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकात हार्दिक पांड्याने महत्त्वाची विकेट घेतली ती म्हणजे फखार जमानची.

फखार जमानच्या विकेट्सने पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. फखार जमान टी-20 मधील महत्वाचा फलंदाज होता. तसेच फखारने भारताविरुद्ध याआधी देखील चांगल्या धावा केल्या आहेत. पण हार्दिकने फखारची घेतलेली विकेट सामन्यातील टर्निग पॉइंट ठरला.टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. 2007 च्या विश्वचषकात उभय संघांमध्ये पहिला सामना झाला होता. 2024 पूर्वी, दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 6 वेळा भारतीय संघ विजयी झाला होता. मात्र या विजयानंतर टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजय विक्रम 7-1 असा झाला आहे.