शिंदे-फडणवीस यांच्यात अचानक बैठक, महायुतीत पडद्यामागे काय घडतंय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांमधील राजकीय घडामोडींमुळे ही निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंच्या पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे? फोडाफोडीच्या राजकारणाबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात काय भावना आहे? ते या निवडणुकीत बघायला मिळणार आहे. महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष आणि भाजप असे प्रमुख तीन पक्ष आहेत. तर महाविकास आघाडीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष, काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा तीन प्रमुख पक्षांचा समावेश आहे. या निवडणुकीत मविआ आणि महायुती यांचं परस्परांना कडवं आव्हान तर आहेच, पण ते आणखी एका आव्हानाला सामोरं जात आहेत. ते आव्हान म्हणजे बंडखोरी. महायुतीला या बंडखोरीचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे बंडोबांचं बंड थांबवण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे यासाठी पडद्यामागे जोरदार घडामोडी सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडोखोरांचं बंड थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास दीड तासांपासून चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडत आहे. या बैठकीत बंडखोरांबाबत चर्चा होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या कोणकोणत्या बंडखोर नेत्यांची मनधरणी घरुन त्यांचं बंड थंड करता येऊ शकते, जेणेकरुन ते उमेदवारी अर्ज मागे घेतील, याबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. या बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीला होता कामा नये, अशी चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

काही विशेष जागा आहे, ज्या जागांकडे संपूर्ण राज्य आणि देशाच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यामध्ये माहीम-दादरची एक जागा आहे. या मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरजीव अमित ठाकरे उमेदवार आहेत. तर शिवसेनेकडून सदा सरवणकर यांनी अर्ज दाखल केला आहे. सदा सरवणकर माघार घेण्यास तयार नाहीयत. तर एकनाथ शिंदे यांनीदेखील कार्यकर्त्यांचं मनोबल कुठेही तुटणार नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमकी माघार कोण घेणार? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. यातून काही मार्ग काढता येईल का? याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.