‘दुआ’ हेच नाव का? ‘प्रार्थना’ का नाही? मुलीच्या नावावरून नेटकऱ्यांचा दीपिका पादुकोणला सवाल

दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या मुलीचं नाव जाहीर केलं. सोशल मीडियावर एक खास फोटो पोस्ट करत त्यांनी मुलीचं नाव ‘दुआ पादुकोण सिंह’ ठेवल्याचं म्हटलंय. दीपिकाची ही पोस्ट क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यावर नेटकरी आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला. अनेकांनी दीपिका आणि रणवीरला शुभेच्छा दिल्या. मात्र काही प्रतिक्रिया या नावावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्याही होत्या. दीपिकाने तिच्या मुलीचं नाव ‘दुआ’ का ठेवलं, असा सवाल काहींनी केला. तर ‘दुआ’ नाव ठेवण्यापेक्षा ‘प्रार्थना’ हे नाव अधिक चांगलं वाटलं असतं, असंही काहीजण म्हणाले.

दीपिकाने मुलीच्या पायांचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘दुआ पादुकोण सिंह.. दुआ : याचा अर्थ प्रार्थना. कारण ती आमच्या प्रार्थनांचं उत्तर आहे. आमचं हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरलंय.’ दीपिकाच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. त्यापैकी काही प्रतिक्रिया या ट्रोल करणाऱ्याही होत्या. दुआ एखादं हिंदू नाव नाही मिळालं का? दुआ हेच नाव का? प्रार्थना का नाही? तुम्ही दोघं हिंदू आहात.. हे विसरलात का’, अशी कमेंट एकाने केली. तर ‘प्रार्थना हे नावसुद्धा ठेवू शकली असती. मुस्लीम नावच का? बॉलिवूडमधील कलाकार जाणूनबुजून असं करतात. ते सनातन धर्माच्या भावना दुखावतात’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. अनेकांनी ट्रोल केलं तरी काहींनी रणवीर आणि दीपिकाची बाजूसुद्धा घेतली.‘ही त्यांची मुलगी आहे आणि त्यांना कोणतंही नाव ठेवण्याचा अधिकार आहे’, असं म्हणत काही नेटकऱ्यांनी दीपिका-रणवीरला पाठिंबा दिला. तर ‘जगा आणि इतरांनाही जगू द्या’ असं काहींनी म्हटलंय.

अभिनेत्री दीपिकाने 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. 2018 मध्ये रणवीर आणि दीपिका यांनी लग्न केलं. प्रेग्नंसीदरम्यानही दीपिकाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. ‘फेक बेबी बंप आहे’, असं म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं.फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने चाहत्यांना प्रेग्नंसीची ‘गुड न्यूज’ दिली होती. सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याचं तिने म्हटलं होतं. तेव्हापासून दीपिकाचा बेबी बंप पाहण्यासाठी नेटकरी आतूर झाले होते. लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होत असताना दीपिका आणि रणवीर सिंह हे आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते. त्यावेळी पहिल्यांदाच दीपिकाचा बेबी बंप पहायला मिळाला होता. मात्र त्यानंतरही काहींनी दीपिकाला ट्रोल केलं होतं. मे महिन्यात जेव्हा दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हासुद्धा तिचा बेबी बंप न दिसल्याने नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. मे महिना उजाडला तरी दीपिकाचं पोट अजून कसं दिसत नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता.