प्रेमविवाहाचा हृदयद्रावक शेवट! कौटुंबिक वादातून डोक्यावर दंडुकाचा प्रहार करीत पत्नीने पतीचा केला खून

पंधरा वर्षांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीतील भांडण विकोपाला गेलं. त्यातून पत्नीनं डोक्यात जोरदार प्रहार पतीचा केल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.धुळप्पा नंदकुमार हेले (वय ३५, रा. तांदूळवाडी) असे मृत्यू पावलेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी प्रगती धुळप्पा हेले हिने स्वतः पोलिसांना झाल्या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान, सोलापर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलिस नाईक आसिफ शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. रक्तबंबाळ अवस्थेत धुळप्पा हेले यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

सोलापुर तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक देशपांडे यांनी सांगितले.मयत धुळप्पा यांची आई नातेवाइकांचे लग्न असल्याने कुंभारीला गेली होती. सकाळपासून धुळप्पा आणि पत्नीचे भांडण सुरू होते. प्रगतीच्या माहेरकडील लोकही घरी आले होते, असे सांगण्यात येत आहे. धुळप्पाच्या डोक्यात लाकडासारख्या वस्तूने जोराचा प्रहार झाल्याने रक्त्तबंबाळ अवस्थेत धुळप्पा घरामध्ये बेशुद्ध होऊन पडल्याचे चित्र पाहायला मिळाल्याचे मयताचा चुलत भाचा श्रीकांत बोरगावकर यांनी सांगितले.

हा प्रकार दुपारी १२ च्या सुमारास घडला असावा. प्रत्यक्षात पत्नीनं स्वतःहून १०० क्रमांवर डायल करून झाल्या घटनेची माहिती स्वतः पोलिसांना दिल्याने तातडीने चक्रे फिरली आणि सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्यासह त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शासकीय रुग्णालयात तपासणी करून धुळप्पाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.