बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या इमारतीला आग लागली होती. खुद्द त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आणि प्रार्थनांसाठी चाहत्यांचे आभार मानले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही भयानक घटना सांगितली. अंधेरीतील ओबेरॉय कॉम्प्लेक्समधील 13 मजली स्काय पॅन बिल्डिंगच्या अकराव्या मजल्यावर ही आग लागली होती. याच इमारतीच्या दुसऱ्या विंगमध्ये उदित नारायण राहतात. सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवळपास चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मध्यरात्री 1.49 वाजता ही आग नियंत्रणात आली. याविषयी उदित नारायण म्हणाले, “मी इमारतीच्या ए विंगमध्ये अकराव्या मजल्यावर राहतो आणि ही आग बि विंगमध्ये लागली होती.
आम्ही सर्वजण इमारतीच्या खाली आलो होतो आणि जवळपास तीन ते चार तास आम्ही सर्वजण खाली उभो होतो. ती आग खूप भयंकर होती आणि त्यात काहीही झालं असतं. आम्ही सुरक्षित आहोत, यासाठी देवाचे आणि आमच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानतो.”ही आग इतकी भयंकर होती की त्याचा उदित नारायण यांच्या मनावर खूप परिणाम झाला. याविषयी ते पुढे म्हणाले, “या घटनेनं मला हादरवून टाकलंय. त्यातून बाहेर पडायला मला काही वेळ लागेल. जेव्हा तुम्ही अशा घटनांविषयी ऐकता, तेव्हा तुम्ही फक्त त्याबद्दल विचार करू शकता.
पण जेव्हा तुम्ही त्या परिस्थितीत असता, तेव्हा ते किती त्रासदायक असतं हे तुम्हालाच कळतं.” या आगीच्या घटनेत एका वृद्ध व्यक्तीने आपले प्राण गमावले, तर आणखी एका व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामध्ये दोन जणांचा श्वास कोंडला होता. त्यांना जवळच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
त्यापैकी एका 75 वर्षीय राहुल मिश्रा यांचं निधन झालं. तर 38 वर्षीय रौनक मिश्रा यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. फ्लॅटमधील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्स आणि घरगुती वस्तूंना ही आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.