काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विश्वजित कदम, देशमुख, ठाकूर चर्चेत

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले हे पायउतार होणार असून, नव्या प्रदेशाध्यक्षपद हा तरुण चेहरा असेल, अशी चर्चा आहे. विश्वजित कदम, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री अमित देशमुख यांची नावे या पदासाठी आघाडीवर आहेत.लवकरच याबाबत निर्णय होणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पटोले हे प्रदेशाध्यक्ष बनले होते. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीला चार वर्षे झाली आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाले असले तरी विधानसभेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यामुळे पटोले यांना हटविण्याची मागणी पक्षातून केली जात आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी तरुण नेत्यांचा शोध सुरू आहे. पक्षात पुन्हा उत्साह निर्माण करेल, असे नेतृत्व काँग्रेसला हवे आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यासह वरिष्ठ नेत्याच्या नावांवर फुली मारली गेल्याचे समजते.