मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलाविलेल्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली आहे. या बैठकीला दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत.मात्र एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी अनेकांच्या डोळ्यात भरणारी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये अजूनही नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.
राज्यातील महत्वाच्या विकासकामांसंबंधी आणि प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती. सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजता बैठकीला सुरूवात झाली. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती आहे .बैठकीला समाज कल्याण, पाणी पुरवठा अशा खात्यांचे मंत्री आणि अधिकारीही उपस्थित आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या गृहनिर्माण हे अतिशय महत्त्वाचे खाते असतानाही बैठकीला त्यांची अनुपस्थिती असल्याने उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.मागील आठड्यात संपन्न झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावून एकमेकांसमोर येणे त्यांनी टाळले असल्याची चर्चा झाली.