दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईनं आधीपासूनच सर्वसामान्य माणूस पिचला आहे. अशातच बटाटा (Potato Prices), कांदा (Onion Prices), टोमॅटो (Tomato Prices) अशा प्रमुख भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अलिकडच्या आठवड्यात दररोजच्या जेवणात समावेश असणाऱ्या या प्रमुख भाज्यांचे भाव वाढले आहेत, याचाच परिणाम अन्नधान्याच्या महागाई दरावर दिसून येतो.
ग्राहक व्यवहार विभागानं जाहीर केलेल्या जानेवारीच्या आकडेवारीनुसार, बटाट्याचा किरकोळ दर वार्षिक आधारावर 33 टक्क्यांनी वाढला आहे आणि सध्या तो 20 रुपये प्रति किलो दरानं विकला जात आहे. तर कांद्याच्या किरकोळ भावात 20 टक्के वाढ होऊन ती 30 रुपये किलो झाली असून टोमॅटोच्या दरांत वार्षिक 50 टक्के वाढ झाली आहे, तर किरकोळ बाजारात 30 रुपये किलोनं विकली जात आहे.फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पुढील काही महिन्यांत टोमॅटो आणि बटाटा यांसारख्या भाज्यांच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते.
गतवर्षी याच काळात टोमॅटो आणि बटाट्याच्या भावात 36 टक्के आणि 20 टक्क्यांनी घसरण झाली होती. जुलै 2023 मध्ये, पावसाळ्याच्या खराब परिस्थितीमुळे, टोमॅटोच्या किमती 202 टक्क्यांनी वाढल्या होत्या आणि देशाच्या अनेक भागांमध्ये ते 100 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त विकले गेले होते. यानंतर सरकारनं बाजारपेठेत हस्तक्षेप करून पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी अनेक ठिकाणी टोमॅटो 70 रुपयांनी विकले होते.