मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी ही आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रात जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव असतो. खंडोबा ज्यांचा कुलदेव आहे. त्यांच्या घरात चंपाषष्ठीच्या निमित्ताने नवरात्र साजरी केली जाते.
याविषयी ज्येष्ठ पंचागतज्ज्ञ दा. कृ. सोमण यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिलेली माहिती जाणून घेऊ.चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो. या दिवशी खंडोबाला महानैवेद्य अर्पण करतात. त्यात ठोंबरा, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ असतात. ठोंबरा हे नाव काहींना अपरिचित वाटेल. जोंधळे शिजवून त्यात दही, मीठ घालून केलेल्या पदार्थाला ठोंबरा म्हणतात. तसेच गव्हाच्या लोंब्या, हुरडा, तीळ आणि गूळ हे पदार्थ एकत्र करून त्याचा दिवा करतात. त्यात फुलवात लावतात.
महानैवेद्य दाखविण्यापूर्वी तळी भरतात. एका ताम्हनात पाने, पैसा, सुपारी, भंडार व खोबरे हे पदार्थ ठेवून येळकोट असा उद्घोष करून ते ताम्हन तीनदा उचलणे यालाच ‘तळी भरणे’ म्हणतात. ताम्हण उचलताना प्रत्येकवेळी भंडार भरलेली खोबऱ्याची वाटी मोडतात. मग दिवटी बुधली घेऊन आरती करतात. मग जेजुरीच्या दिशेने चार पावले जाऊन देवाला ओवाळतात व भंडार उधळून पुनश्च जागेवर येतात.
लाक्षणिक अर्थाने याला ‘जेजुरीला जाऊन येणे’ असे म्हणतात. नंतर दिवटी दुधाने विझवतात.मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी ही आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रात जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव असतो. मणि आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले. या घटनेचे स्मरण रहावे म्हणून चंपाषष्ठीला हा उत्सव साजरा करतात.
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून सुरू झालेला हा उत्सव चंपाषष्ठीच्या दिवशी समाप्त होतो. या नवरात्रात घटस्थापना, नंदादीप, खंडोबाची पूजा, मल्लारी माहात्म्याचा पाठ, एकभुक्त राहणे, शिवलिंगाचे दर्शन, वाघ्या-मुरळी भोजन , भंडार (हळद) उधळणे इत्यादी गोष्टी करतात. कुत्रा हे खंडोबाचे वाहन असल्यामुळे त्यालाही खाऊ घालतात.