यंदा 26 डिसेंबर २०२३ मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री गुरु दत्त जयंती सोहळा होत आहे. जाणून घ्या दत्तात्रेय जयंती वेळ, पूजा विधी, गुरुकृपा, दत्त आरती याविषयी जाणून घेऊ.ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित अवतार म्हणून ओळखले जाणारे भगवान दत्तात्रेय यांची जयंती २६ डिसेंबर २०२३ रोजी साजरी करण्यात येत आहे. या दिवशी पहाटे ५ वाजून ४६ मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ होत आहे आणि समाप्ती २७ डिसेंबरला सकाळी ६ वाजून २ मिनिटांनी होणार आहे. हिंदू पंचागानुसार मार्गशीर्ष पोर्णिमा या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान दत्तात्रेय यांचा जन्म दिवस हा दत्त जयंती म्हणून साजरा करतात.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. विशेषत: दत्त जयंती हि डिसेंबर महिन्यातच येते.
दत्त जयंती या दिवशी मंदिर व परिसरात रोषणाई केली जाते. हार फुलांचे तोरण लावली जातात. ठीक ठिकाणी पारायण, भजन, किर्तनाचे आयोजन केले जाते. या दिवशी दत्त गुरुंना सुंठवड्याचा प्रसाद दाखवून भक्तांमध्ये वाटप करावा. दत्ताला पिवळे फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई, फळे अर्पित करतात.संध्याकाळच्या दत्ताचा जन्म वेळी जन्माचे कीर्तन असते. जन्मा नंतर पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक निघते. दत्त जयंती निमित्त अनेक दत्त मंदिरामध्ये दत्त जन्म साजरा झाला की भंडार्याचेही आयोजन केले जाते. दानशूर व्यक्ती महाप्रसाद अन्नदान वाटपाचा कार्यक्रम करतात.
या दिवशी अवधूत गीता पाठ केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. तसेच भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने सुख, समृद्धी, वैभव मिळते.बहुतांश दत्त मंदिरे किंवा स्वामी समर्थ महाराज मठ या ठिकाणी दत्त जयंती च्या अगोदर गुरुचरित्र पारायण वाचन सप्ताह आयोजित करतात. दत्त उपासक आणि स्वामी भक्त महिला पुरुष सेवेकरी सकाळी ग्रंथ पुजन करून त्याचबरोबर सामुदायिक संकल्प सोडून ग्रंथ वाचन सुरु करतात. पुढील सात दिवस ठराविक अध्याय दररोज वाचन करून शुद्ध आहार, विचार आणि ठरवून दिलेल्या आचरण नियमाप्रमाणे गुरु सेवा करायची असते.
कलियुगातील संसारिक जीवनात अनंत अडचणी सुख दु:खे मनुष्याला भोगावी लागत असतात. पूर्व जन्म कर्म फळ, पितृदोष, शारीरिक, मानसिक व्याधी, आर्थिक समस्या तसेच इतरही अनेक भौतिक सुखे इत्यादी मध्ये मनुष्य जीवन व्यतीत करत असतो. हे मानवी जीवनचक्र सुलभ होऊन गुरुबळ मिळावे, आध्यत्मिक मार्गाने ईश्वराची सेवा घडावी आणि आपल्या जीवनातील दुखः हरण होवून जास्तीतजास्त सुख लाभावे यासाठी धार्मिक परंपरेनुसार गुरुचरित्र पारायण करून दत्त जयंती सोहळा मनोभावे केला जातो.
दत्तात्रेय हा देव आहे जो दैवी त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे . दत्त या शब्दाचा अर्थ “दिलेला” आहे, दत्ताला असे म्हटले जाते कारण दैवी त्रिमूर्तीने गुरू अत्री आणि माता अनुसूया या ऋषी जोडप्याला पुत्राच्या रूपात “दिले” आहे. तो गुरु अत्र्यांचा पुत्र आहे, म्हणून त्याचे नाव “अत्रेय” आहे. हिंदू धर्माचे पहिले गुरु म्हणून दत्तात्रेयांना समजले जाते.
दत्तसंप्रदायाचा प्रभाव हा मुख्यत: महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतो. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी असे अत्यंत उच्चकोटीचे साधक याच परिवाराचा भाग आहेत आणि महाराष्ट्राबाहेरही दक्षिण भारतात त्यांची विविध मंदिरं असून नित्यनियमाने तेथे पूजा अर्चना केली जाते. महाराष्ट्रातील आणि जवळपासच्या राज्यांतील दत्ताची तीर्थक्षेत्रे पाहूयात.
महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतातील प्रमुख दत्त तीर्थक्षेत्र खालीलप्रमाणे –
१) माहुर – किनवट तालुका, जि. नांदेड ( माहूरगड हा रेणुकामाता साठी देखील प्रसिद्ध आहे )
२) औंदुबर – पलूस तालुका, जि. सांगली
३) गाणगापूर – अफजलपूर तालुका, गाणगापूर कर्नाटक
४) नृसिंहवाडी – शिरोळ तालुका, जि. कोल्हापूर ( नरसोबाची वाडी )
५) कुरवपूर – कृष्णा-भीमा नद्यांचा संगम – रायचूर जि. कर्नाटक-आंध्रा सीमा भाग ( ‘ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ‘ मंत्र उच्चार या ठिकाणी झाला )
६) श्री क्षेत्र पीठापूर- पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्रप्रदेश. श्रीपादांचे जन्मस्थान (दक्षिण काशी )
७) अक्कलकोट – (सोलापूर,महाराष्ट्र) ( स्वामी समर्थ महाराज – दत्त अवतार )
दत्त मंत्र
श्री गुरुदेव दत्त…
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा….
दत्त जयंती दिवशी खास नैवद्य
सर्वप्रथम घेवड्याची भाजी नैवद्यात असावी. हि भाजी दत्त गुरुंना अतिशय प्रिय आहे. ( कांदा लसून विरहीत भाज्या असाव्यात ) पिवळा बटाटा भाजी , मुगाची पातळ भाजी, साधी पोळी – पुरी, भात, कोबीची पिवळी भाजी, चनाडाळ घातलेली भाजी, मुगडालीची पिवळी खिचडी,डाळभात, मसालेभात, तूरडाळ पिवळी खिचडी, साधा पुलाव,आमटी आणि कढी- पिवळी डाळीची आमटी,मुगाचे डाळीचे वरण,ताकाची पिवळी कढी,कडधान्याची आमटी, गोड पोळी, किंवा आंब्याचा शिरा, गोड शेवयांची खीर,पिवळ्या जिलेबी,मोतीचूर लाडू,चटणी, कोशिंबीर,लोणचे पापड इ.नैवद्य नेहमी केळीच्या पानावरच वाढवावेत.
वरील प्रमाणे नैवद्य दाखवणे शक्य न झाल्यास काही हरकत नाही, दत्त महाराजांना भक्तांनी मनापासून बनवलेले अन्न पदार्थ गोड व प्रिय असते. म्हणतात ना देव भक्तीचा भुकेला म्हणूनच आपण दत्त जयंतीला मनापासून दत्त महाराजांची सेवा भक्ती करणे महत्त्वाचे आहे.