शाहरुख, सलमान, अल्लू अर्जुनला मागे टाकत ‘छावा’ने मोडला रेकॉर्ड; २३व्या दिवशीही अपेक्षापेक्षा जास्त कमाई

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ऐतिहासिक सिनेमा ‘छावा’ बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला २३ दिवस झाले आहेत. तरीही चित्रपटाची कमाई कमी झालेली नाही.

चौथ्या आठवड्याची सुरुवात ही चित्रपटाच्या ८.७५ कोटी रुपयांच्या कमाईने झाली. शनिवारी चित्रपटाने जवळपास १६.५ कोटी रुपयांची कमाई केली. जवळपास चित्रपटाच्या कमाईत ५० टक्के वाढ झाली. ‘छावा’ सिनेमाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यामध्ये चित्रपटाने ८४.५ कोटी रुपयांची कमाई केली. आता चौथ्या आठवड्याची सुरुवात चांगली झाल्याचे दिसत आहे.

Sacnilk.com च्या माहितीनुसार, चित्रपटाने आतापर्यंत ५०८.८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, हिंदी रिलिजने ५०३.३ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तेलगु डब व्हर्जनने ५.५ कोटी रुपयांची कमाई केली. चौथ्या आठवड्यातही चित्रपटाच्या कमाईत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सिनेमा येत्या दिवसामध्ये किती कमाई करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेतच.

या चित्रपटाला मिळत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल विकीने त्याच्या हँडलवर लिहिले, ‘तुमच्या अफाट प्रेमाबद्दल धन्यवाद.’ चित्रपटाच्या यशाला महाराष्ट्रात सर्वाधिक पाठिंबा मिळाला आहे. पुष्पा २ द रुल सारख्या मोठ्या सिनेमाचे विक्रम छावा सिनेमाने मोडले आहेत. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ (रु. 244.14 कोटी), राझी (रु. 123.74 कोटी), सॅम बहादूर (93.95 कोटी) आणि जरा हटके जरा बचके (5 कोटी 88 कोटी) यांच्या पुढे छावा पोहोचला आहे.

‘छावा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल दिसत आहे, त्यांची पत्नी येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत. त्यामध्ये संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे.