आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला. या विजयानंतर संपूर्ण देशाने जल्लोषात आनंद साजरा केला गेला. भारतीय संघाचे खेळाडू मैदानाच्या मध्यभागी सेलिब्रेशन करताना दिसले. या मोठ्या प्रसंगी भारतीय क्रिकेटचे दिग्गज देखील स्वत:ला नाचण्यापासून रोखू शकले नाहीत. टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर या प्रसंगी खूप आनंदी दिसले आणि त्यांनी भर मैदानात डान्स करायला सुरुवात केली. दुसरीकडे माजी खेळाडू नवज्योतसिंग सिद्धूनेही कोणतीही कसर सोडली नाही. हार्दिक पांड्यासोबत त्याने गौतम गंभीरलाही भांगडा करायला लावला.
७५ वर्षांचे गावस्कर भर मैदानात नाचू लागले
टीम इंडियाचा हा ऐतिहासिक विजय पूर्ण उत्साहात साजरा केला. टीम इंडियाच्या हातात चॅम्पियन्स ट्रॉफी पाहून सुनील गावस्कर खूश झाले आणि त्यांनी मैदानाच्या मध्यभागी येऊन आनंदाने डान्स केला. त्यांना नाचताना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. या खास प्रसंगी टीम इंडियाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाही गावस्कर यांच्यासोबत दिसला, जो कॉमेंट्री पॅनेलचा एक भाग होता. सुनील गावसकर यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना तो खूप आवडला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माचाही आनंद गगनात मावत नव्हता. या दोन स्टार खेळाडूंनी हातात स्टंप घेऊन दांडिया डान्स केला. त्याचवेळी टीम इंडियाचे काही खेळाडू गंगनम स्टाइल डान्स करताना दिसले. जो विराट कोहलीने 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर केला होता.