संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगोला तालुक्यात कडकडीत बंद 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच कै. संतोष देशमुख व स्व. सोमनाथ सुर्यवंशी यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी रविवार दिनांक ९ मार्च रोजी सांगोला शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाज व बहुजन समाज यांच्यावतीने बंद पुकारण्यात आलेला होता. सकाळी शहरातील महात्मा फुले चौकातून मुकमोर्चा सुरू करून, सांगोला तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

सांगोला तालुक्यातील जवळा, महूद, घेरडी, कोळा, जुनोनी, वाटंबरे, डोंगरगाव, वाढेगाव, मेडशिंगी, आलेगाव यासह सर्वच गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष करून राज्यात प्रसिद्ध असणारा जनावरांचा बाजारही बंद ठेवण्यात आला होता. भाजी मंडई, आठवडा बाजार व व्यापार पेठ बंद ठेवण्यात आल्याने आठवडा बाजार परिसरात शुकशुकाट दिसून येत होता.