राज्यात होळी आणि धुळवडीचा उत्साह साजरा होत असतानाच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्रिपद देण्याची ऑफर दिली. भाई (एकनाथ शिंदे) आणि दादा (अजित पवार) यांनी काँग्रेससोबत यावे. आम्ही दोघांनाही मुख्यमंत्री करू, असे विधान करून पटोले यांनी शुक्रवारी राज्याच्या राजकारणात चांगलीच धमाल उडवून दिली. ही ऑफर म्हणजे हास्यास्पद प्रकार असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आणि विरोधकांना त्याच भाषेत राजकीय टोला लगावला!
महाविकास आघाडी आणि ‘महायुती’च्या नेत्यांमधील या राजकीय धुळवडीची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. पटोले यांच्या या ऑफरवर काँग्रेस पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काँग्रेससोबत या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला मुख्यमंत्री करू, असा विश्वास आम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार यांना दिला आहे, असे पटोले यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्याचा सर्व कारभार मुख्यमंत्री कार्यालयातूनच चालत असल्याने व आमचे मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा नवा आयाम शासन, प्रशासनाला दिला असल्यामुळे उपमुख्यमंत्रिपदी असलेले एकनाथ शिंदे, अजित पवार हे त्रासले आहेत.
या दोघांपैकी कोणीही जवळचा नाही, हे त्यांनादेखील आता माहीत झाले आहे. यामुळेच आता, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आमच्यासोबत यावे, त्यांना आम्ही मुख्यमंत्रिपदाची संधी देऊ. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे. दोघांनाही निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे, त्यामुळे आम्ही ही संधी आलटून-पालटून त्यांना देऊ, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
पुढील दहा-पंधरा वर्षे काँग्रेसला संधीच नाही : बावनकुळे
पटोले यांच्या ऑफरची भाजपचे नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, पुढील दहा-पंधरा वर्षे काँग्रेसला राज्यात संधीच नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पटोलेंनी दिलेली ऑफरच हास्यास्पद आहे. भाजपने कुठलीही ऑफर पटोले यांना दिलेली नाही. त्यांनी सध्या आहेत त्याचप्रमाणे काँग्रेसमध्येच राहावे, असा सल्लादेखील बावनकुळे यांनी दिला आहे.
‘ईडी’च्या भीतीने महायुती सोडणार नाही : कडू
पटोले यांची ऑफर, त्यावर बावनकुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया, या राजकीय धुळवडीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. ‘ईडी’ची एवढी भीती आहे की, त्यामुळे महायुतीतील भाजप वगळता अजित पवार गट आणि शिंदे गटाचे नेते बाहेर पडणार नाहीत. ‘ईडी’चा ससेमिरा लावून घेण्यापेक्षा सत्तेत राहणे, पवार, शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.