आयपीएल 2025 स्पर्धेसाठी मेगा लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. 24 आणि 25 नोव्हेंबरला खेळाडूंवर बोली लागली. या लिलाव प्रक्रियेत दहा फ्रेंचायझींनी कोट्यवधी रुपयांची उधळण केली. लखनौ सुपर जायंट्स सर्वाधिक बोली लावत ऋषभ पंतला आपल्या ताफ्यात घेतलं. ऋषभ पंतसाठी लखनौने 27 कोटी रुपये मोजले. अस असताना क्रीडाप्रेमींना आणखी लिलाव प्रक्रिया पाहण्याचा योग जुळून येणार आहे.
वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेसाठी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत पाच संघ खेळतात. तसेच प्रत्येक संघात सहा विदेशी खेळाडूंसह 18 खेळाडूंची परवानगी आहे. सर्व संघांना 15 कोटींची रक्कम ठरवली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला संघांनी रिटेंशन यादी जाहीर केली होती. यात फ्रेंचायझींनी काही ठरावीक खेळाडू रिलीज केले आहेत. कारण यावेळेस मिनी ऑक्शन होणार आहे.ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, वुमन्स प्रीमियर लीगचं 2025 हे तिसरं पर्व आहे. या पर्वाआधी 15 डिसेंबरला बंगळुरुत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
या लिलावात लिलावात इंग्लंडची कर्णधार हीदर नाइट, न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज ली ताहुहू, वेस्ट इंडिजची अष्टपैलू डिआंड्रा डॉटिन, भारताची अष्टपैलू खेळाडू स्नेह राणा, लेगस्पिनर पूनम यादव आणि फलंदाज वेदा कृष्णमूर्ती यांसारखे स्टार खेळाडू लिलावाचा भाग आहेत. याशिवाय नवोदित खेळाडूंवरही संघांची नजर असणार आहे. आतापर्यंत वुमन्स प्रीमियर लीगचे दोन पर्व पार पडली आहेत. पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्स, तर दुसऱ्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजय मिळवला आहे.