औरंगजेबच्या कबरीचे दुर्दैवाने संरक्षण करावे लागत आहे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य

क्रूरकर्मा मुघल सम्राट औरंगजेबची कबर कायमची नेस्तनाबूत करावी, ती महाराष्ट्रातून कायमस्वरूपी हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. मुंबईसह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली जात आहे. संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवली नाही तर विश्व हिंदू परिषद कारसेवा करत स्वतः कबर हटवेल, असा इशाही सरकारला देण्यात आला आहे. त्यामुळे, शासनाकडून सध्या औरंगजेबाच्या कबरीला अधिकच संरक्षण देण्यात आले आहे. या प्रकणावरुन राज्यात गदारोळ सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी, येथील कार्यक्रमातून त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावे लागत असल्याची खंत बोलून दाखवली. मात्र, औरंग्याचे महिमामंडन होऊ देणार नाही, असे वचनही त्यांनी दिले. छत्रपती शिवरायांनी देखील अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केले. शेतकरी, बलुतेदार यांना एकत्र केले. आपल्याला देव, देश धर्माकारिता लढायचे आहेत, यासाठी तयार केले, हे जे बीजारोपण त्यांनी केले. त्यामुळेच नंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी यांनी स्वराज्यासाठी योगदान दिले. शिवरायानंतर मराठ्यांनी औरंगजेबाला येथेच गाडला, मुघलांचा निःपात केला, दिल्लीवर भगवा फडकावला.

त्यामुळेच, एकोप्याने राहणारा महाराष्ट्र महाराजांना अपेक्षित आहे, जातींमध्ये विभागलेला महाराष्ट्र त्यांना अपेक्षित नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. औरंगजेबाच्या कबरीला एएसआयने ५० वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन कधीच होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एक वचन तुम्हाला देतो, काहीही झाले तरी या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही, उदात्तीकरण होऊ देणार नाही, तसा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न चिरडून टाकू, हे वचन छत्रपती शिवरायांच्या मंदिरासमोर देतो, असे मुख्यमंत्र्यांनी भिवंडीतील कार्यक्रमातून ठणकावून सांगितले.