लाडक्या बहिणींना आणखी एक मोठं गिफ्ट….

महायुती सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती.या योजनेनुसार पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे महिलावर्ग आनंदात असताना आता राज्य सरकारने त्यांना आणखी एक भेट द्यायचे ठरवले आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवून लाडक्या बहिणींना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. लवकरच यासंदर्भात शासकीय आदेश काढला जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारीही सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.