ना विषप्रयोग, ना गळा दाबला… मग सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं कारण काय? ‘क्लोजर रिपोर्ट’मध्ये मोठा खुलासा

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्याच्या मृत्यू कारण नमूद करण्यात आलं आहे. शिवाया सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला देखील दिलासा मिळाला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही असं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. कोणीही अभिनेत्याला मृत्यूसाठी प्रवृत्त केलं नाही. कोणीही अभिनेत्याचा गळा दाबला नाही. एवढंच नाही तर, अभिनेत्यावर विषप्रयोग देखील झालेला नाही… असं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं असून अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण आत्महत्या आहे… असं सांगण्यात आलं आहे.

सीबीआयने विशेष न्यायालयात सादर केला ‘क्लोजर रिपोर्ट’

सीबीआयने ‘क्लोजर रिपोर्ट’ मुंबईतील विशेष न्यायालयासमोर सादर केला आहे. सीबीआयने सादर केलेला ‘क्लोजर रिपोर्ट’ आता न्यायालय स्वीकारेल की मृत्यू प्रकरणी पुढील तपास करण्याचे आदेश देईल.. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

किती वर्ष सुरु होता तपास?

14 जून, 2020 मध्ये सुशांत याने मुंबईतील वांद्रे याठिकाणी असलेल्या राहत्या घरात स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये सर्वत्र खळबळ माजली होती आणि अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले. ज्यामुळे 6 ऑगस्ट 2020 मध्ये सीबीआयने तपास करण्यास सुरुवात कोली. तपासात सीबीआयने सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि अभिनेत्याच्या जवळच्या अनेक लोकांचे जबाब नोंदवले.

अभिनेत्याच्ये मेडिकल रिपोर्ट देखील तपासण्यात आले. एम्सच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सीबीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, सुशांतच्या मृत्यूमध्ये ‘विष किंवा गळा दाबून मारण्यात आल्याचा दावा केल्याप्रमाणे कोणताही पुरावा सापडला नाही. आता 4 वर्ष, 6 महिने आणि 15 दिवसांनंतर सीबीआयने अंतिम क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

सीबीआयने ‘या’ दोन प्रकरणांचा केला तपास

सुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग यांनी पाटण्यात रिया चक्रवर्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यासोबतच त्याने अभिनेत्रीवर फसवणूक आणि पैशांचा गैरवापर केल्याचा आरोपही केला होता. सुशांत कुटुंबियांकडून गंभीर आरोप झाल्यानंतर रिया हिने देखील तक्रार दाखल केली. ज्यामध्ये अभिनेत्रीने सुशांतच्या कुटुंबीयांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट आता कोर्टासमोर आहे. न्यायालय या निकालाशी सहमत आहे की तपासाला पुढे जाण्याचे निर्देश देते यावर ते अवलंबून आहे. या प्रकरणातील सत्य जाणून घेण्याची मागणी सुशांतचे चाहते अनेक दिवसांपासून करत आहेत.