लॉर्ड्समध्ये भारताला हरवल्यावरही इंग्लंडचं नुकसानच

भारत विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील तिसरा सामना हा लॉर्ड्स मैदानावर खेळवला गेला. यात तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी 193 धावांचे आव्हान मिळाले होते. तर सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला 135 धावा करण्याची आवश्यकता होती. मात्र विजयाचं आव्हान पूर्ण करण्यात त्यांना यश आलं नाही आणि 22 धावांसह इंग्लंडचा विजय झाला. यामुळे इंग्लंडने सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी मिळवली आहे. चौथा सामना हा 23 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. परंतु त्यापूर्वीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसलाय.

लॉर्ड्स टेस्टमध्ये भारताला हरवल्यावर इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका लागला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे इंग्लंडचे दोन अंक कापण्यात आले असून याचा फटका त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये सुद्धा बसला आहे. ज्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंडचा संघ खालच्या स्थानावर घसरला आहे.

स्लो ओव्हर रेटमुळे इंग्लंडचा कर्णधार असलेल्या बेन स्टोक्सवर लॉर्ड्स टेस्टनंतर मॅच फीच्या 10 टक्के दंड लावण्यात आला आहे. इंग्लंडने हा सामना 22 धावांनी जिंकला परंतु या दरम्यान त्याच्या संघाने नियोजित वेळेपेक्षा दोन ओव्हर कमी टाकली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मते, सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी इंग्लंडला हा दंड ठोठावला.