अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित या चित्रपटात सलमानसोबतच रश्मिका मंदाना, शर्मन जोशी, काजल अग्रवाल, सत्यराज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. गुढीपाडवा आणि ईदच्या सुट्ट्या लागोपाठ आल्याने त्याचा या चित्रपटाच्या कमाईवर चांगला परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तर पहिल्याच दिवशी हा चित्रपट जवळपास 40 ते 50 कोटी रुपयांचा गल्ला जमवेल असं म्हटलं जातंय. चाहत्यांनी सलमानचा हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच शोला गर्दी केली आहे. ज्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलाय, त्यांनी त्याचा रिव्ह्यू सोशल मीडियावर देण्यास सुरुवात केली आहे.
एका युजरने लिहिलं, ‘कोणीतरी म्हटलंय की या चित्रपटाच्या कथेत ना हृदय आहे, डोळे आहेत ना फुफ्फुसं. मी यापेक्षा चांगल्या शब्दांत म्हणू शकतो की कदाचित गेल्या काही दिवसांत मी यापेक्षा वाईट चित्रपट पाहिला नसेल. मला खरंच याची अपेक्षा नव्हती.’ तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, ‘सिकंदर पाहिला आणि मी थक्क झालो. सलमान खानचं आतापर्यंतचं दमदार अभिनय, भावनिक दृश्ये आणि जबरदस्त अॅक्शन सीन्स. या सर्वांचं योग्य मिश्रण या चित्रपटात पहायला मिळतं. रश्मिकानेही चांगलं काम केलंय. याला मी दहा पैकी नऊ स्टार्स देऊ शकतो.’ आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘हे देवा, सिकंदर पूर्णपणे ब्लॉकबस्टर ठरणार आहे. सलमान खान.. लव्ह यू भाईजान.’ काहींनी ‘सिकंदर’चं कौतुक केलंय तर काहींना हा चित्रपट पसंतीस पडला नाही. त्यामुळे प्रेक्षकांकडून सलमानच्या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळतोय, असं म्हणायला हरकत नाही.
सलमानचा 2023 मध्ये ‘टायगर 3’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर गेल्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर त्याचा कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. त्यामुळे आता ‘सिकंदर’विषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे 2.2 लाख तिकिटं विकली गेली आहेत. हा आकडा फक्त हिंदी व्हर्जनचा आहे. ‘सिकंदर’चे संपूर्ण भारतात हिंदी भाषेतील 8 हजार शोज आहेत. 2017 मध्ये ईदला प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने विशेष कमाई केली नव्हती. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून नापसंती मिळाली होती. त्यानंतर ‘टायगर 3’नेही जेमतेम कामगिरी केली होती. त्यामुळे आता सलमानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.