अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ब्रेकअप केला. अर्जुनने एका कार्यक्रमात सर्वांसमोर ‘मी आता सिंगल आहे’ असं म्हटलं होतं. त्यानंतर मलायकानेही अप्रत्यक्षपणे रिलेशनशिपमध्ये नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ब्रेकअपनंतर नुकतंच या दोघांना मुंबईतील लिलावती रुग्णालयाबाहेर एकत्र पाहिलं गेलं. हे दोघं अभिनेता सैफ अली खानला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते.
सैफवर 16 जानेवारी रोजी त्याच्यात राहत्या घरात एका चोराने चाकूहल्ला केला होता. त्यानंतर लिलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अर्जुन आणि मलायका या दोघांची सैफची पत्नी करीना कपूरशी खूप चांगली मैत्री आहे. लिलावती रुग्णालयाच्या बाहेरील अर्जुन आणि मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये मलायका रुग्णालयातून बाहेर येताना दिसत आहे.
त्यानंतर ती तिच्या कारच्या दिशेने चालत जाते. तिच्या मागून अर्जुनसुद्धा रुग्णालयातून बाहेर पडताना दिसतोय. यामुळे हे दोघं पुन्हा एकत्र आले का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अनेकांनी या दोघांना एकत्र पाहून आनंद व्यक्त केला आहे. अर्जुन आणि मलायकाची जोडी ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेतल्या जोडींपैकी एक होती. या दोघांना वयातील अंतरामुळे अनेकदा ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघांनी खुलेपणाने एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला होता.