‘इंडियन आयडॉल’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिॲलिटी शोंपैकी एक आहे. संगीतकार आणि गायक विशाल ददलानी गेल्या सहा वर्षांपासून या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. परंतु आता सहा वर्षांनंतर त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्याचसोबत मोठी पोस्ट लिहित चाहत्यांना शो सोडल्याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, ‘दरवर्षी सहा महिन्यांसाठी मी मुंबईत अडकून पडू शकत नाही.’ त्याचप्रमाणे पुन्हा एकदा गाणी बनवण्याकडे कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्याकडे वळण्याचा उल्लेख त्याने केला आहे.
‘माझा प्रवास इथपर्यंतच होता. सलग सहा सिझन्सनंतर ‘इंडियन आयडॉल’चा परीक्षक म्हणून आज रात्रीचा माझा शेवटचा एपिसोड होता. या शोची मला जितकी आठवण येईल तितकाच या शोलाही माझी आठवण येईल अशी अपेक्षा करतो. श्रेया, बादशाह, आदित्य, आराधना, चित्रा, आनंदजी, सोनल, प्रतीभा, साहिल, सलोनी, मुस्कान, अभिषा, संपूर्ण प्रॉडक्शन क्रू, विलास, पक्या, कौशिक (पिंकी) आणि सर्व परीक्षक, गायकस संगीतकारांचे खूप खूप आभार. हा मंच माझ्यासाठी घरासारखा होता. इथे फक्त निर्मळ प्रेम होतं. हक्कापेक्षा जास्त प्रेम या शोद्वारे मिळालं आहे’, अशा शब्दांत विशालने भावना व्यक्त केल्या आहेत. विशाल हा ‘इंडियन आयडॉल’च्या दहाव्या सिझनपासून म्हणजेच 2018 पासून या शोचा परीक्षक होता.
विशालच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘इंडियन आयडॉल 15’चा सूत्रसंचालक आदित्य नारायणने लिहिलं, ‘हा एका युगाचा अंत आहे. तुमच्याशिवाय इंडियन आयडॉल पहिल्यासारखा कधीच नसेल, मोठा भाऊ. तुमच्यासोबत घालवलेल्या वेळेबद्दल मी कृतज्ञ आहे.’ नुकताच या शोचा पंधरावा सिझन पार पडला. ऑक्टोबरमध्ये या सिझनची सुरुवात झाली होती. रविवारी ग्रँड फिनालेमध्ये कोलकाताच्या मानसी घोषने विजेतेपद पटकावलं.
विशाल हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय गायक आणि संगीतकार आहे. शेखर रविजियानीसोबत त्याची जोडी लोकप्रिय आहे. या दोघांनी ‘ओम शांती ओम’, ‘अंजाना अंजानी’, ‘दोस्ताना’, ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘बँग बँग’, ‘सुलतान’, ‘बेफिक्रे’, ‘वॉर’ यांसारख्या चित्रपटांसाठी गाणी संगीतबद्ध केली आणि काही गायलीसुद्धा आहेत.