देशाच्या हवामानात चांगलाच बदल झालेला दिसून येत आहे. पहाटे आणि सकाळच्या वेळी दाट धुक्यासह थंडी पाहायला मिळत आहे, तर दुपारी उन्हाची झळ बसत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, दक्षिण भारतात पावसाची रिमझिम पाहायला मिळत असताना काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. महाराष्ट्रासह देशात काही भागात डिसेंबरअखेर आणि नववर्षाच्या सुरुवातीली पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, 30 डिसेंबरपासून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार आहे, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. देशभरात कडाक्याच्या थंडी पाहायला मिळत असताना पुढील काही दिवसात हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, डिसेंबरच्या अखेरीस वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल, त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीच्या (IMD) माहितीनुसार, 30 डिसेंबरपासून पूर्वेकडील राज्ये तसेच तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही रिमझिम पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 3 ते 4 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. यासोबतच 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2024 पर्यंत तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. आज राजस्थानच्या विविध भागात दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान उत्तर-पश्चिम आणि लगतच्या मध्य भारतात हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.