त्रिपुरा ठरले देशातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य

त्रिपुराच्या (Tripura) या यशामागे ‘अंडरस्टँडिंग लाइफलाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी’ अर्थात ‘उल्लास’ या अभियानाचा मोठा वाटा आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘पीरिऑडिक लेबर फोर्स सर्व्हे’च्या २०२३-२४मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात त्रिपुराचा साक्षरता दर ९३.७ टक्के होता. तो आता ९५.६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. केंद्र सरकारच्या निकषांनुसार, ९५ टक्क्यांहून अधिक साक्षरता गाठणारी राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना ‘पूर्ण साक्षर’ असा दर्जा दिला जातो.

मिझोराम आणि गोवा यांच्यानंतर त्रिपुरा हे देशातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य ठरले आहे. हा ऐतिहासिक टप्पा सोमवारी पूर्ण झाला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आगरताळ्यातील रवींद्र भवन येथे झालेल्या कार्यक्रमात अधिकृत घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाला मुख्यमंत्री माणिक साहा उपस्थित होते.

‘मिझोराम आणि गोव्यानंतर आता त्रिपुरा हे संपूर्ण साक्षर राज्य ठरले आहे. हा क्षण राज्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक आहे. या यशामागे योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो,’ असे साहा यांनी म्हटले .

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या प्रौढ साक्षरता विभागाच्या संचालक प्रीती मीणा यांनीही राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ‘केंद्र सरकारने सन २०३० पर्यंत भारताला संपूर्ण साक्षर बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्रिपुरामध्ये आम्ही २३,१८४ निरक्षर प्रौढांची ओळख पटवली आणि त्यांना साक्षर बनवण्यासाठी आवश्यक सहकार्य पुरवले,’ असे त्या म्हणाल्या.