‘या’ इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत होणार कमी

भारतीय ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. जीएसटी कौन्सिलने नुकताच घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत मोठी घसरण होणार आहे. हा बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार असून त्याचा थेट फायदा ग्राहकांना होईल. काय आहे निर्णय? कसा होणार फायदा याबद्दल जाऊन घेऊयात.

आतापर्यंत भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 28% पर्यंत GST आकारला जात होता. यामध्ये टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन यांसारख्या मोठ्या घरगुती उपकरणांचा समावेश होता. आता या सर्व वस्तूंना 28% ऐवजी 18% GST स्लॅबमध्ये आणण्यात आले आहे. परिणामी, ग्राहकांना या वस्तू खरेदी करताना 10 टक्क्यांपर्यंत थेट दिलासा मिळणार आहे.

उदाहरणार्थ, एखाद्या टीव्हीची बाजारभाव किंमत 30,000 असल्यास, जुन्या 28% GST दराने ग्राहकांना जवळपास 8,400 कर भरावा लागत होता. पण आता नवीन 18% दरामुळे कर फक्त 5,400 आकारला जाईल. म्हणजेच ग्राहकांना सरळ 3,000 बचत होणार आहे. एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारख्या वस्तूंवरही अशीच बचत होईल.मोठ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. पूर्वी 28% दराने विकल्या जाणाऱ्या वस्तू आता 18% दराने उपलब्ध होतील. मात्र लॅपटॉप, मोबाईल फोन यांसारख्या उपकरणांवर आधीच 18% दर लागू असल्यामुळे त्यांच्यावर कोणताही फरक पडणार नाही.

या बदलामुळे सणासुदीच्या खरेदीच्या हंगामात ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. नव्या दरांची अंमलबजावणी होऊन बाजारातील विक्री वाढण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादक आणि रिटेलर्सनाही विक्रीत वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जुन्या स्टॉकवर नवीन दर लागू होणार की नाही, यावर मात्र उद्योग क्षेत्रात चर्चा सुरू आहे. काही विक्रेत्यांनी आधीच्या दराने वस्तू खरेदी केल्या आहेत, त्यामुळे त्या वस्तूंवर नवीन दरांचा फायदा ग्राहकांना मिळेल का याबाबत शंका आहे. सरकार लवकरच याबाबत मार्गदर्शन करणार आहे.

एकंदरीत, 22 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या या GST बदलामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार असून ग्राहकांना 10% पर्यंत थेट फायदा होणार आहे. आगामी नवरात्री आणि दिवाळीच्या खरेदीसाठी ही बातमी ग्राहकांसाठी खूप मोठा दिलासा ठरणार आहे.