मुंबई (Mumbai) आणि कबुतर यांची एक वेगळीच ओळख आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये कबुतर खाने आहेत, ज्या परिसराची ओळख या कबुतर खान्यामुळे होते. अनेक मुंबईकर या कबुतर खान्याला भेट देऊन कबुतरांना खायला देतात. पण आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईतील कबुतरखाने नाहीसे होणार आहे. राज्य सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिकेला मुंबईतील कबुतरखाने तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करताना शिवसेना नेत्या आणि नामांकित विधान परिषद सदस्या मनीषा कायंदे म्हणाल्या की, या कबुतरखान्यांच्या विष्ठा आणि पंखांमुळे श्वसनाचे आजार होतात, त्यामुळे जवळपास राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आहे.
कौन्सिलच्या आणखी एका नामांकित सदस्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांमुळे त्यांचा जवळचा नातेवाईक मृत्युमुखी पडल्याची माहिती दिली. नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, शहरात 51 कबुतरखाने आहेत. कबुतरांना खायला देण्याच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. महानगरपालिकेला एका महिन्याच्या आत कबुतरखान्यांविरुद्ध जागरूकता मोहीम सुरू करण्यास सांगितले जाईल. कबुतरखाने बंद करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे निर्देश बीएमसीला देण्यात येणार आहे.
उदय सामंत म्हणाले की, दादरमधील प्रसिद्ध कबुतरखाना दोन दिवसांसाठी बंद होता, पण लोकांनी त्याचे पालन न केल्याने आणि कबुतरांना खायला घालत राहिल्याने ते पुन्हा उघडण्यात आले. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात शिंदे म्हणाले की, सांताक्रूझ पूर्व, सांताक्रूझ पश्चिम आणि दौलत नगर येथे अनधिकृत कबुतरखाना बंद करण्यात आले आहेत.